लोणावळ्यात पोलिस ठाण्याजवळील बंगल्यावर दरोडा   

साडेअकरा लाखांची लूट

पिंपरी : लोणावळा शहरातील डॉ. हिरालाल खंडेलवाल यांच्या ओम बंगल्यावर २७ मे रोजी मध्यरात्री २० ते २२ दरोडेखोरांनी धाडसी दरोडा टाकून साडेअकरा लाखांची लूट केली आणि पोलिसांच्या डोळ्यादेखत पसार झाले. विशेष म्हणजे हा बंगला लोणावळा शहर पोलीस ठाण्यापासून अवघ्या काही अंतरावर आहे. ही संपूर्ण घटना रात्री तीनच्या सुमारास घडली. टोळक्याने एका टेम्पोमधून येत बंगल्याच्या परिसरात प्रवेश केला. सीसीटीव्ही सुरक्षा यंत्रणा असूनही त्यांनी ती भेदून मुख्य लोखंडी ग्रील आणि बंगल्याचे पाच ते सहा दरवाजे फोडले. घरात शिरल्यानंतर सुरक्षारक्षक आणि त्याच्या पत्नीला शस्त्राचा धाक दाखवत दोरखंडाने बांधून ठेवले. त्यानंतर टोळीने खंडेलवाल दाम्पत्याला तलवारीचा धाक दाखवत घरातील रोख रक्कम व मौल्यवान वस्तू लुटून नेल्या.
 
या टोळक्याने गुन्हा करून पळताना आपला टेम्पो बंगल्यातच सोडून दिला. या टेम्पोत चपला, कपडे आणि दारूच्या बाटल्या सापडल्या आहेत. यावरून दरोडेखोरांचे नियोजन आणि गुन्ह्याची तयारी स्पष्ट होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी बंगल्याकडे धाव घेतली आणि काही अंतर दरोडेखोरांचा पाठलाग केला. मात्र, हा ‘फिल्मी स्टाईल’ पाठलाग यशस्वी ठरला नाही. चोरटे साडेअकरा लाखांचा मुद्देमाल घेऊन सहजतेने पसार झाले. या प्रकाराचा सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागला असून त्यावरून पुढील तपास सुरू आहे.
 
घटनेनंतर परिसरात भीतीचे आणि असुरक्षिततेचे वातावरण पसरले आहे. स्थानिक नागरिक आणि व्यापारी वर्गातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. नागरिक प्रतिनिधी श्रीधर पुजारी यांनी पोलिसांवर कडक कारवाईची मागणी करत म्हटले, जर लवकरात लवकर आरोपी पकडले नाहीत, तर लोणावळा बंदची हाक दिली जाईल.लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांनी सांगितले की, घटनेनंतर तात्काळ चार विशेष पथके तयार करून संशयितांचा शोध सुरू करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेज, पुरावे आणि स्थानिक माहितीच्या आधारे तपास वेगाने सुरु आहे.
 
खंडेलवाल यांच्या घरावर चौथा दरोडा
 
विशेष म्हणजे डॉ. हिरालाल खंडेलवाल यांच्या बंगल्यावर पडलेला हा चौथा दरोडा आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या घराची सुरक्षा यंत्रणा, स्थानिक गुन्हेगारी नेटवर्क आणि पोलीस यंत्रणेच्या कामगिरीवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवून तपास पुढे नेण्यात येत आहे. आरोपी लवकरच पोलिसांच्या तावडीत येतील, अशी अपेक्षा आहे. मात्र, या घटनेने लोणावळ्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Related Articles